Ad will apear here
Next
डिजिटल पुस्तके म्हणजे प्रकाशनाच्या क्षेत्रातील संकट नसून संधी : अनिल मेहता


चिपळूण :
‘नव्या माध्यमांच्या वापरातून आपले मन सुसंस्कृत करणे ही प्रत्येकाची गरज आहे. सुसंस्कृत मने तयार करण्यात पुस्तकांचा आणि पर्यायाने प्रकाशकांचा वाटा मोलाचा असतो. त्यामुळे नव्या युगातील डिजिटल पुस्तके म्हणजे प्रकाशनाच्या क्षेत्रातील संकट नसून संधी आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांनी २८ डिसेंबर २०१९ रोजी चिपळुणात व्यक्त केले.

चिपळूण येथील लोकमान्य टिळक वाचन मंदिर, महाराष्ट्र साहित्य परिषदेची चिपळूण शाखा आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे २८ आणि २९ डिसेंबर रोजी दुसऱ्या लेखक-प्रकाशक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. या वेळी नाटककार अरविंद तथा अप्पासाहेब जाधव व्यासपीठावर संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, आमदार शेखर निकम, मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, प्रमुख कार्यवाह नितीन गोगटे, नगराध्यक्ष सुरेशदादा बेहेरे, संमेलन कार्याध्यक्ष आणि लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्यक्ष अरुण इंगवले, ‘पानिपत’कार लेखक विश्वास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.



आपल्या भाषणात अनिल मेहता यांनी प्रकाशन व्यवसायातील अडचणींबरोबरच या व्यवसायातील विविध संधींचाही आढावा घेतला. ते म्हणाले, ‘प्रकाशन व्यवसाय एखादा संदेश बाटलीत भरून ती बाटली बंद करून समुद्रात भिरकावण्यासारखा असतो. त्यामध्ये शाश्वती नसते; मात्र प्रत्येक प्रकाशक ही बाटली योग्य जागी पोहोचावी, यासाठी बाटलीसह स्वतः त्या समुद्रात उडी घ्यायला सज्ज असतो. अशा या व्यवसायात अनिश्चितता असली, अनेक आव्हाने असली, तरी ती पेलण्यासाठी आपण सज्ज असले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या आधुनिक काळात आज शेकडो संधी आपल्या दाराशी लोळण घेत आहेत. पीओडी (प्रिंट ऑन डिमांड) तंत्रज्ञान प्रकाशन व्यवसायातील क्रांती आहे. प्रकाशन व्यवसायाचा गाभा असणारा कंटेंट तयार करण्यासाठी अनेक संधी आहेत. सोशल मीडियाने नव्या लेखकांना मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यातून चांगल्या लेखकांचा शोध प्रकाशकांनी घ्यायला हवा. फ्रँकफर्ट, नवी दिल्लीसारख्या बुकफेअरमध्ये हजेरी लावली पाहिजे. नव्या माध्यमांमुळे वितरकांची मक्तेदारी मोडीत निघण्याची शक्यता आहे. तीसुद्धा संधी साधली पाहिजे. वेबसाइट, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅपसारख्या विविध माध्यमांमधून पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. वाचकांचा प्रतिसाद मिळत नाही, म्हणून पुस्तकांच्या प्रकाशनाचे कार्यक्रम कमी होऊ लागले आहेत. त्याऐवजी पुस्तकाचा विषय लक्षात घेऊन त्याच्याशी संबंधित सामाजिक घटकांबरोबर असे कार्यक्रम आखणे उपयुक्त ठरू शकते.’

प्रकाशकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांचा उल्लेखही मेहता यांनी आपल्या भाषणात केला. शासनमान्य पुस्तकांची यादी दर वर्षी जाहीर करणे, २०१२पासून बंद केलेले वाचनालयांचे अनुदान सुरू करणे, राजा राम मोहन रॉय फाउंडेशनच्या जाचक अटी रद्द करणे अशा विविध मुद्द्यांचा त्यामध्ये समावेश होता. अॅमेझॉनवर भारतीय भाषांपैकी सर्वाधिक मराठी पुस्तकांची विक्री होते आणि त्यामध्ये मेहता प्रकाशनाच्या सुमारे १२०० पुस्तकांचा समावेश आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

चिपळूणमध्ये वीरेश्वर तलाव मंदिर परिसरात साकारलेल्या नानासाहेब जोशी नगरीत दोन दिवसांच्या या संमेलनाला २८ डिसेंबरला प्रारंभ झाला. सकाळी ९ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात झाली. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या हस्ते झाले.

त्यानंतर सुरू झालेल्या उद्घाटन समारंभात संमेलनाचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले यांनी लोकमान्य टिळक वाचन मंदिराच्या कार्याचा आढावा घेतला. या वाचनालयाने कोकण मराठी साहित्य परिषदेचे पहिले साहित्य संमेलन, नाट्य संमेलन, अ. भा. मराठी साहित्य संमेलन अशी दहा संमेलने आतापर्यंत आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. 

अ. भा. मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे म्हणाले, ‘साहित्यविषयक अनेक संमेलनांमध्ये लेखक आणि प्रकाशकांना एकत्र आणणाऱ्या संमेलनाची उणीव होती. ती या संमेलनाने भरून काढली आहे. पुस्तकांचे गाव असलेल्या भिलारमध्ये गेल्या वर्षी पहिले संमेलन झाले. दुसरे संमेलन कोकणाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या चिपळूणमध्ये भरत आहे. वाचन संस्कृती वाढवायची असेल, सुसंस्कृत समाज घडवायचा असेल, तर अशा संमेलनांची आणि पुस्तकांच्या प्रदर्शनाचीही गरज आहे. पुस्तकाच्या प्रकाशनाचा व्यवसाय म्हणजे केवळ एक व्यवसाय नव्हे, तर सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतर व्हावे, तशी ही रोमांचक घटना असते.’

प्रकाशन संघातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही बर्वे यांनी दिली. प्रकाशकांना सजग करणे, त्यासाठी कार्यशाळा घेणे, सरकारदरबारी करून द्यायच्या कामांसाठी मध्यस्थ म्हणून काम करणे, उत्तम निर्मितीसाठी प्रकाशकांना गेली २३ वर्षे दिला जाणारा पुरस्कार, दोन वर्षांपासून सुरू असलेला दिवाळी अंक पारितोषिकाचा उपक्रम इत्यादींचा त्यामध्ये समावेश होता.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आपल्या भाषणात वाचनसंस्कृती लोप पावत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. शिक्षणाबरोबरच वाचनाचे संस्कारही महत्त्वाचे आहेत, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची गावोगावी वाचनालये सुरू करण्याची योजना आणि अन्य काही आठवणी त्यांनी सांगितल्या. वाचनालयांची गंभीर अवस्था दूर करण्यासाठी काही प्रयत्न व्हायला हवेत, असे सांगून ते म्हणाले, ‘पुस्तके विकली गेली नाहीत, तर प्रकाशक तोट्यात, लेखक रस्त्यावर येतो आणि वितरक दुकाने बंद करतो. ही स्थिती बदलण्यासाठी सरकारनेही प्रयत्न करायला हवेत. जिल्ह्यात ग्रंथोत्सव व्हावेत, त्याला शासनाने अनुदान, प्रोत्साहन द्यावे.’



भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी सांगितले, ‘मराठीत दर वर्षी होणाऱ्या सुमारे १५० साहित्य संमेलनांत लेखक केंद्रस्थानी असतात. लेखक आणि प्रकाशकांना केंद्रस्थानी ठेवणारे हे संमेलन आहे. दुसरे लेखक-प्रकाशन संमेलन कोकणात होत असून हा चांगला योग आहे. श्री. ना. पेंडसे, चिं. त्र्यं. खानोलकर, मधू मंगेश कर्णिक असे साहित्यिक कोकणात झालेच; पण नाथ पै, मधू दंडवते अशा संसदपटूंची भाषणे म्हणजे आधुनिक साहित्याचा प्रकारच होता. वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे अशा केवळ चार मराठी साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. मराठी म्हणजे साहित्यसमृद्धीची खाण असताना मोजक्याच साहित्यिकांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. त्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले आहे. आता त्याकडे लक्ष द्यावे. गेल्या शंभर वर्षांत झाले नाहीत, एवढे बदल तंत्रज्ञानामुळे गेल्या १०-१५ वर्षांत प्रकाशनाच्या क्षेत्रात झाले. ई-बुकपर्यंत प्रवास येऊन ठेपला आहे. त्याकडे संधी म्हणून पाहिले पाहिजे.’

भारती विद्यापीठाने साहित्य चळवळींना कसा पाठिंबा दिला, ते त्यांनी यावेळी सांगितले. १९७९ साली झालेला ग्रामीण साहित्य मेळावा, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शतक महोत्सव, कराड येथील साहित्य संमेलन, साहित्यप्रेमी भगिनी मंडळातर्फे १५० वर्षांतील महिलांच्या कार्याचा आढावा घेणारा तीन खंडांचा ग्रंथ निर्माण करण्यात भारती विद्यापीठाने सक्रिय सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले.



चिपळूणचे नवनिर्वाचित आमदार शेखर निकम यांना या वेळी लोकमान्य टिळक वाचन मंदिरातर्फे मानपत्र देण्यात आले. त्यांना लवकरच मंत्रिपद लाभावे आणि त्यांनी साहित्य चळवळीला मदत करावी, अशी अपेक्षा अनेक वक्त्यांनी व्यक्त केली होती. तिचा संदर्भ घेऊन निकम म्हणाले, ‘ग्रंथालयांना मदत करण्यासाठी कोणत्याही पदाची गरज नाही. ‘लोटिस्मा’च्या फिरत्या ग्रंथालयासारख्या आणि वस्तुसंग्रहालयासारख्या पूर्वीच्या उपक्रमांनाही मी नेहमीच मदत करीन.’

या वेळी संमेलनाध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते विविध प्रकाशकांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. उद्घाटनानंतरच्या सत्रात ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांची ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी मुलाखत घेतली.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/SZCPCH
Similar Posts
मातीच्या आड गेलेले लढवय्ये हेच स्फूर्तीचे झरे चिपळूण : ‘मातीच्या आड गेलेले लढवय्ये, हेच स्फूर्तीचे खरे झरे आहेत. लेखक त्यातील माती आणि वाळू बाजूला करतो आणि रत्न सादर करतो,’ अशा शब्दांत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी ऐतिहासिक कादंबरीलेखनामागची आपली भूमिका स्पष्ट केली. ‘पानिपत’सह संभाजी, पांगिरा, झाडाझडती इत्यादी कादंबऱ्यांचा लेखनप्रवास चिपळुणात
चिपळुणात २८-२९ डिसेंबरला दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन पुणे : दुसरे लेखक-प्रकाशक संमेलन चिपळूणमध्ये २८ आणि २९ डिसेंबर २०१९ रोजी होणार आहे. मेहता पब्लिशिंग हाउसचे प्रमुख अनिल मेहता यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
संतांनी केलेल्या बंडखोरीकडे आजच्या साहित्यिकांनी पाहावे : डॉ. अरुणा ढेरे रत्नागिरी : ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी सर्वांत मोठी बंडखोरी कोणी केली असेल, तर ती संतांनी आणि तीसुद्धा कोणत्याही प्रकारचा झेंडा न नाचवता! गीता शूद्रांपर्यंत पोहोचवणं ही बंडखोरीच होती. या संतकालीन बंडखोरीकडे नव्या साहित्यिकांनी पाहिले पाहिजे,’ असे प्रतिपादन ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा व ज्येष्ठ साहित्यिका डॉ
आधुनिक प्रसारमाध्यमांचा वापर केल्यास वाचनसंस्कृतीला धोका नाही चिपळूण : ‘आधुनिक प्रसारमाध्यमांचा योग्य तो उपयोग करून घेतला, तर प्रकाशन व्यवसाय आणि मराठी वाचन संस्कृतीला कोणताही धोका नाही,’ असा सूर चिपळूणमध्ये भरलेल्या दुसऱ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनातील परिसंवादात निघाला. चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, महाराष्ट्र साहित्य परिषदेची चिपळूण शाखा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language